नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना व्हायरसचा वेग मंदावताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाच्या या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. बहुतेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र. आता देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आता देशात शाळा पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत.
अनेक राज्यांमध्ये बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये १ सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये कडक निर्बंधांसह शाळा सुरू होणार आहेत.
आजपासून उत्तर प्रदेशमध्ये इयत्ता १ ते ५ वीपर्यंतच्या शाळा सुरू होतील. शिक्षण परिषदेने देखरेखीसाठी पथके तयार केली आहेत, जी कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यावर लक्ष ठेवतील. सकाळी ८ वाजल्यापासून शाळा सुरू होतील आणि दोन शिफ्टमध्ये दोन्ही वर्ग घेण्यात येतील.
ऑफलाइन तसेच ऑनलाइन क्लासचे पर्यायही उपलब्ध असतील. याचबरोबर, आजपासून १२ वीपर्यंतच्या शाळा उत्तर प्रदेश तसेच दिल्ली आणि मध्य प्रदेशात सुरू होतील. आजपासून दिल्लीत ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होतील तर सहावी ते बारावीपर्यंतची मुले आजपासून मध्य प्रदेशात शाळेत जातील.
राजस्थानमधील शाळाही सुमारे सहा महिन्यांनंतर आजपासून सुरू होणार आहेत. कर्नाटक सरकारनेही १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. राजस्थानमध्ये नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सकाळी साडेसातवाजल्यापासून शाळेत तर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सकाळी आठ वाजल्यापासून शाळेत जाणार आहेत. इयत्ता ८ वी आणि त्यापेक्षा कमी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा कोणताही निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.
या राज्यांच्या सरकारने केवळ शाळा उघडण्याची परवानगी दिली नाही तर कोरोनासंबंधी कठोर मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत, ज्याचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझेशनवर भर देण्यात आला आहे. राजस्थान सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवळ ६० टक्के मुले शाळेत जाऊ शकतील. तर ४०% मुलांचा अभ्यास ऑनलाइन होणार आहे.