ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 15 - शाळेत जायचं म्हणलं की विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन जावं लागतं. अनेकदा या दप्तरांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची दमछाक होते. मात्र कानपूरमधील एका प्राथमिक शाळेने यावर उपाय काढत अनोखी कल्पना राबवली आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्याच्या हेतूने शाळेने दप्तरांना पिक अप करण्याची सुविधा सुरु केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आरामशीरपणे चालता येणं शक्य होईल. जीएम उच्च प्राथमिक शाळेने ही सुविधा सुरु केली असून पालकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
काही आर्थिक कारणांमुळे शाळेला विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा सुरु करणं शक्य नसल्याने त्यांनी ही वेगळी कल्पना अंमलात आणली आहे. यासाठी एक गाडी ठेवली असून ही गाडी ठरलेल्या ठिकाणांवरुन विद्यार्थ्यांचं दप्तर पिक अप करेल आणि शाळेत पोहोचवेल.
"यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चालण्याची आवड निर्माण होईल, तसंच शाळेत पोहोचण्यासाठी वाहनावर अवलंबून राहण्याची त्यांची सवयही मोडेल. शाळेतील 300 विद्यार्थी या सुविधेचा फायदा घेत आहेत", असं मुख्याध्यापिका गुंगाबाई यांनी सांगितलं आहे.
"दप्तराविना शाळेत जाण्यात काही वेगळीच मजा आहे", असं आठवीत शिकणारी फातीमातुल सांगते. ही कल्पना ज्यांच्या डोक्यात आली ते शिक्षक एन एम रवी यांनी सांगितलं की, "अनेकदा विद्यार्थ्यांना जड दप्तर घेऊन येताना समस्यांचा सामना करावा लागायचा. त्यामुळेच आम्ही गतवर्षी ही सुविधा सुरु केली".
सध्या ही सुविधा मोफत आहे. मात्र येणारा खर्च निघावा यासाठी शाळा दर विद्यार्थ्यांमागे महिना 15 ते 20 रुपये भाडं आकारणार आहे. शाळेत जाताना दप्तर पिक अप करण्याची सोय असली तरी शाळा सुटल्यानंतर ही सोय नाही. अनेकदा दप्तरांवरुन गोंधळ होण्याची शक्यता असल्याने शाळा सुटल्यानंतर ही सुविधा देण्यात आलेली नाही.