ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 4 - योगगुरु रामदेव बाबा शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी पंतजली सैनिक शाळा सुरु करणार आहेत. यावर्षी ही शाळा सुरु करण्यात येणार असून दिल्ली - एनसीआरच्या आसपास ही शाळा असेल अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली आहे. सुकमा नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात आल्याचंही रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितलं. हरिद्वारमधील पतंजली योगपीठाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
24 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 25 जवान शहीद झाले तर सहा जवान जखमी झाले होते. नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले.
Will open 'Patanjali Aavasiya Sainik school' this year for children of martyred soldiers, free of cost. Location will be around NCR: Ramdev pic.twitter.com/1zcSCexzou— ANI (@ANI_news) May 4, 2017
यावेळी बोलताना रामदेव बाबा यांनी गेल्या वर्षी पतंजलीला 10 हजार 561 कोटींचा नफा झाल्याची माहिती दिली आहे. देशभरात पतंजलीचे तब्बल 6 हजार वितरक असून त्याची संख्या 12 हजारापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट पतंजलीसमोर आहे. तसंच हरिद्वारसोबतच जम्मूमध्येही नवा प्लान्ट उभारणार असल्याचं रामदेव बाबांनी सांगितलं. पुढील दोन वर्षात देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनण्याचं लक्ष्य असल्याच रामदेव बाबा म्हणाले.
यावेळी बाबा रामदेव यांनी सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. चीन हा पैसा पाकिस्तानला दहशतवादी कारवाई करण्यासाठी पुरवतो, असा दावा रामदेव बाबांनी केला.