ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - गणित आणि विज्ञान विषय शिकवण्याच्या त्याच त्याच जुनाट पद्धतीमुळे माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा या दोन विषयांमधील रस कमी होत चालल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने हे निरीक्षण नोंदवले आहे.
गणित आणि विज्ञान विषयात रुची नसल्यामुळे विद्यार्थी पुढे मानवविज्ञान आणि कॉमर्स या विषयांकडे वळत असल्याचेही समितीने म्हटले आहे. गणित, विज्ञान या दोन विषयात दर्जेदार आणि चांगल्या शिक्षकांची कमतरता असल्याचेही या समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्याने योजना आखण्यासाठी विशेष कार्यदलाची स्थापना करण्याची सूचना समितीने आपल्या अहवालात केली आहे.
गणित-विज्ञान शिकवण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्याबाबत शिक्षकही तितके गंभीर नसल्याचे समितीने म्हटले आहे. समितीने दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा आणि उत्तरप्रदेशमधील शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तसेच विविध माहितींचा अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे.
विज्ञान आणि गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी केंद्रीय पातळीवरुन झालेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे या अहवालात नमूद केले आहे. विज्ञान विषय शाळेमध्ये वैज्ञानिक संशोधनाची रुची निर्माण होईल अशा दृष्टीकोनातून शिकवला गेला पाहिजे असे नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे देशाला प्रगतीची नवी शिखरे गाठता येतील असे मोदींचे मत आहे.