गांधीनगर (गुजरात) - आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी आता परस्परविरोधी नाहीत, तर त्यांची उत्तम सांगड घालून प्रभावी वैद्यकीय उपचार करता येतात, असे फुप्फुस विकारतज्ज्ञ व होमिओपॅथीचे समर्थक डॉ. जसवंत पाटील यांनी म्हटले आहे. गुजरातच्या गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन व एक्झिबिशन सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड होमिओपॅथी डे २०२५’ परिषदेमध्ये त्यांनी हे विचार व्यक्त केले.
परिषदेचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते झाले. एकात्मिक वैद्यकीय प्रणालीसाठी भारताला जागतिक केंद्र बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे. त्याच गोष्टीने प्रेरित होऊन केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (सीसीआरएच) आणि राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग (एनएचसी) व राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था (एनआयएच) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेमध्ये पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकीय प्रणाली एकत्र करण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाली. त्यात ‘दुहेरी शक्ती : होमिओपॅथी आणि आधुनिक वैद्यक यांचे शास्त्रीयदृष्ट्या एकत्रीकरण’ या विषयावर डॉ. पाटील यांचे भाषण झाले. कोरोना साथीच्या काळात महाराष्ट्राच्या आयुष टास्क फोर्सचे सदस्य म्हणून डाॅ. जसवंत पाटील यांनी तयार केलेल्या उपचार पद्धतींमुळे मृत्यूदर कमी झाला आणि रुग्ण बरे होण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या सुधारला.