"विज्ञान खोटे बोलत नाही," देशातील कोरोना मृत्यूंबाबत राहुल गांधींचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 08:38 AM2022-05-07T08:38:15+5:302022-05-07T08:38:48+5:30
‘हू’च्या अहवालावर केले भाष्य
नवी दिल्ली : कोरोनाकाळात देशात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात केला आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, मोदी खोटे बोलतात, पण विज्ञान कधी खोटे बोलत नाही.
राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, ४७ लाख भारतीय नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर, सरकार मात्र ४.८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगते. त्यांनी सरकारला असे आवाहन केले आहे की, ज्या लोकांचा या काळात मृत्यू झाला त्या कुटुंबाला ४ लाख रुपये मदत दिली जावी.
जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल बिनबुडाचा
भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाला या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील निष्कर्षावर सेंट्रल कौन्सिल ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेलफेअर या संघटनेच्या १४व्या परिषदेत तीव्र आक्षेप घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने काढलेला निष्कर्ष बिनबुडाचा व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, अशी टीका या परिषदेतील वक्त्यांनी केली आहे. जगभरात कोरोनामुळे सुमारे दीड कोटी लोक मरण पावले असून, त्यातील बहुसंख्य लोक आग्नेय आशिया, भारत व अमेरिकेतील आहेत असा निष्कर्ष गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात मांडला आहे. जगभरात ६२ लाख लोकांचा मृत्यू झाला असे विविध देशांच्या अधिकृत आकडेवारीतून दिसून येते.