तिरुपती : शिक्षण संस्थांसह सर्व भागधारकांत वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक दायित्व (एसएसआर) योजना सुरू करावी, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केली. मूलभूतपासून उपयोजितपर्यंत विज्ञानाच्या विविध शाखांना साहाय्य, तसेच नाविन्यपूर्णतेवर भर देण्याप्रतीची सरकारची बांधिलकी अधोरेखित करतानाच विध्वंसक तंत्रज्ञानावर नजर ठेवण्याचे, तसेच देशाच्या वृद्धीसाठी तडफेने काम करण्याचे आवाहनही त्यांनी शास्त्रज्ञांना केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०४ व्या अधिवेशनाच्या उ्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि विकासाच्या मूलभूत पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि कुशलता निर्माण करून देशाला भक्कम बनविणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, आपल्या प्रमुख संस्थांना शाळा व महाविद्यालयांसह सर्व भागधारकांशी जोडण्यासाठी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक दायित्व ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. आमच्या तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उच्चकोटीचे प्रशिक्षण मिळाल्यास, स्पर्धात्मक युगात नोकरी मिळविण्यास ते सक्षम होऊ शकतील. सायबर फिजिकल तंत्राचा वेगवान जागतिक उदय या क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे. रोबोट विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल उत्पादन, आकडेवारीचे विश्लेषण, सखोल अभ्यास, क्वांटम दूरसंचार आणि इंटरनेटमध्ये संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्य याद्वारे आपण याचे मोठ्या संधीत रूपांतर करू शकतो. तंत्रज्ञानाचा विकास करून त्यांचा उपयोग सेवा आणि उत्पादन, कृषी क्षेत्रासह जल, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि भू माहिती प्रणाली, आर्थिक प्रणाली आणि गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यात करू शकतो. अकॅडमिक, स्टार्ट अप्स, उद्योग आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांना उपलब्ध होऊ शकेल, अशी विज्ञान व तंत्रज्ञानाची भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यास सरकारचे प्राधान्य आहे. वैज्ञानिक संस्थांतील महागड्या उपकरणांची प्रतिरूपे तयार करणे, अतिरेकी वापर, सहज उपलब्धता, देखभाल आदी समस्या सोडविण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. (वृत्तसंस्था)‘संशोधक’ शिक्षकांनी विद्यापीठांशी संलग्न व्हावे- शहरी भागातील प्रयोगशाळा, संशोधन संस्था आणि विद्यापीठांनी केंद्र म्हणून काम करण्यासाठी स्वत:ला इतर संस्थांशी जोडून घेतले पाहिजे. - संशोधनाची पार्श्वभूमी असलेले महाविद्यालयीन शिक्षक नजीकची विद्यापीठे आणि संशोधन आणि विकास संस्थांशी संलग्न होऊ शकतात.- या संस्थांनी शाळा, महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांपर्यंत पोहोचून प्रशिक्षण उपक्रम सुरू केल्यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळेल. तसेच शालेय विद्यार्थ्यांत कल्पना आणि नाविन्यपूर्णतेचे बीजारोपण केल्यामुळे नविनीकरणाच्या पायाची व्याप्ती वाढून देशाचे भवितव्य सुरक्षित राहील, असेही ते म्हणाले.
वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना हवी
By admin | Published: January 04, 2017 2:39 AM