लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संपूर्ण भारतासाठी सध्या असलेली एकच प्रमाण वेळ बदलून विविध भागांसाठी भिन्न प्रमाण वेळा ठरविणे कितपत व्यवहार्य आहे याचा वैज्ञानिक अभ्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केला आहे.या विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, सरकारला यावर निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी या विषयाच्या वैज्ञानिक बाबी तपासण्याचे काम आम्ही करत आहोत. ईशान्येकडील राज्यांसाठी स्वतंत्र प्रमाण वेळ ठरवावी, अशी मागणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी अलीकडेच व त्याआधी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली होती. हे प्रकरण तिथे न्यायालयातही गेले होते.या राज्यांमध्ये देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सूर्योदय व सूर्यास्त खूप लवकर होतो. मात्र सरकारी कार्यालये व अन्य व्यवहार दिल्लीच्या प्रमाण वेळेनुसार होत असल्याने ते सुरू होईपर्यंत अर्धा दिवस संपलेला असतो. कार्यालयीन वेळ संपेपर्यंत बरीच रात्र झालेली असते. परिणामी दिवसा उजेडीचा निम्मा वेळ कामाविना जातो व रात्री वीज जाळून काम करावे लागते, असे पेमा खंडू यांनी ही मागणी करताना सांगितले होते. या संदर्भात सचिव शर्मा म्हणाले की, निरनिराळ्या प्रमाण वेळा ठरविल्याने नेमकी किती वीज बचत होऊ शकते, वाहतुकीची त्याने कितपत सोय होईल. एकूणच याचे काय फायदे-तोटे आहेत याचा वैज्ञानिक अभ्यास सुरू आहे. अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप व मिनिकॉय या द्वीपसमूहांमध्येही सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळा वेगळ्या असल्याने सामायिक प्रमाण वेळेमुळे येणाऱ्या अडचणी तेथेही आहेत.
भिन्न प्रमाण वेळांचा वैज्ञानिक अभ्यास
By admin | Published: June 23, 2017 12:24 AM