नवी दिल्ली : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ व प्रोफेसर यश पाल (९०) यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळातील आजारामुळे निधन झाले. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी दिली. नोयडातील रुग्णालयात पाल यांचे रात्री ८ वाजता निधन झाले, असे त्यांचे चिरंजीव राहुल पाल यांनी सांगितले. राहुल पाल हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागात शास्त्रज्ञ आहेत. यश पाल हे अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणाºया शक्तिशाली किरणांच्या अभ्यासासाठी ख्यातनाम होते.यश पाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही भारतीय शिक्षण क्षेत्रावर कायमचा ठसा उमटवणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ गमावला.’’यश पाल यांच्या निधनाने डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या पिढीतील दुवा देशाने गमावला आहे, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय राघवन यांनी म्हटले.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यश पाल यांच्या निधनाबद्दल टिष्ट्वटरवर शोक व्यक्त केला. नव्या पिढीला आपल्याकडील ज्ञान देणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते, असे सोनिया गांधी म्हणाल्या. राहुल गांधी म्हणाले की, ‘‘यश पाल हे शिक्षणाचा ध्यास घेतलेले शास्त्रज्ञ होते व त्यांच्या निधनामुळे मोठी हानी झाली आहे.’’
शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 4:11 AM