नवी दिल्ली : देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलले आहे. रालोआ सरकारने देशात हिंदू धर्मीय हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न चालविल्याचा थेट आरोप करीत प्रसिद्ध वैज्ञानिक पुष्पमित्र भार्गव यांनी गुरुवारी पुढील आठवड्यात पद्मभूषण पुरस्कार परत करीत असल्याची घोषणा केली. शिवाय सरकारी अविवेकाचा तीव्र निषेध करणारे निवेदन लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिकांसह ५० पेक्षा जास्त इतिहासकारांनी गुरुवारी केले.अशी चिंता व्यक्त करणाऱ्या वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये पद्मभूषण विजेते अशोक सेन, पी. बलराम आदींचा तर समावेश आहे. तर रोमिला थापर, इरफान हबीब, के.एन. पन्नीकर आणि मृदुला मुखर्जी आदी नामवंतांसह एकूण ५३ इतिहासकारांच्या वतीने ‘सहमत’ ने संयुक्त निवेदन जारी केले आहे.हैदराबाद येथे हैदराबादेतील सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक ८७ वर्षीय वैज्ञानिक पुष्पमित्र भार्गव यांनी १९८६ मध्ये मिळालेला पद्मभूषण किताब परत करण्याचे जाहीर करताना देशातील वातावरणाकडे लक्ष वेधले. महत्त्वाच्या पदांवर रा.स्व.संघाशी संलग्न लोकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. भाजपा ही रा.स्व. संघाची राजकीय आघाडी आहे. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) संचालकांच्या बैठकीला संघाच्या लोकांनी हजेरी लावावी असे इतिहासात कधीही घडले नव्हते, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पुरस्कार वापसीत आता वैज्ञानिकही
By admin | Published: October 30, 2015 1:34 AM