नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट अद्याप टळलेले नसल्याने शाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचाही विलंब होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला व शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या एकूण शैक्षणिक तासिकांना कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी असे संकेत देताना सांगितले की, देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती व पालक आणि शिक्षकांकडून केली जात असलेली विनंती लक्षात घेऊन वरीलप्रमाणे पाऊल उचलण्यावर आमचा विचार सुरूआहे. कदाचित १५ आॅगस्टनंतर शाळा सुरू केल्या जाऊ शकतील, या आधीच्या विचारावरही फेरविचार सुरू आहे. शाळा पुन्हा केव्हा सुरू करायच्या, याचा निर्णय आॅगस्टमधील परिस्थिती पाहूनच करावा लागेल, असे दिसते. दरम्यान, सीबीएसईच्या १० वी १२ वीचे निकाल १५ आॅगस्टपर्यंत काही दिवसांच्या अंतराने जाहीर केले जाण्याची शक्यता आहे, असेही मंत्री म्हणाले.तामिळनाडूत १० वीची परीक्षा रद्द, सर्व विद्यार्थी पासचेन्नई : तामिळनाडूत यंदाची इयत्ता १० वीची बोर्डाची परीक्षा न घेता सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मानून त्यांना वरच्या वर्गात प्रवेश दिला जाईल, असे मुख्यमंत्री एडापद्दी पलानीस्वामी यांनी मंगळवारी जाहीर केले. तेलंगणा सरकारनेही सोमवारी असाच निर्णय घेतला होता. कोरोनाचा ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने नेहमी मार्च-एप्रिलमध्ये होणारी इयत्ता १० ची बोर्डाची परीक्षा होऊ शकली नव्हती. आता ‘लॉकडाऊन’ची कठोरता खूपच कमी झाल्याने ही परीक्षा येत्या १५ जूनपासून घेण्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. या परीक्षेस नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार होते; परंतु कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसताना परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यावर उच्च न्यायालयाने टीका केली होती व फेरविचार करण्यास सांगितले होते.
नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला कात्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 7:33 AM