SCO Summit S Jaishankar: गोव्यात शुक्रवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी भारतात आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना दहशतवादी देशाचा प्रवक्ता म्हटले. दहशतीत पीडित आणि कारस्थान करणाऱ्यांसोबत चर्चा होऊ शकत नाहीत, अशी स्पष्टोक्ती जयशंकर यांनी केली.
जयशंकर यांनी यावेळी पाकिस्तानला दहशतवादावरुन घेरले आहे. एससीओ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा प्रमोटर आणि संरक्षक म्हटले. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे आणि राहील, असे ठणकावून सांगितले. तसेच, इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांप्रमाणे भुट्टो यांना योग्य तो मान दिला जाईल, यापेक्षा जास्त अपेक्षा करू नयेत, असेही ते यावेळी म्हणाले.
अलीकडेच भुट्टो यांनी पाकिस्तानी मीडियाशी बोलताना म्हटले होते की, जोपर्यंत काश्मीरमध्ये कलम 370 येत नाही, तोपर्यंत भारतासोबतचे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत. त्यावरुन जयशंकर म्हणाले, कलम 370 आता इतिहासजमा झाली आहे. आता पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (POK) कधी आमच्या ताब्यात देणार, त्यावरच चर्चा करावी. आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणत आहोत. पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या आर्थिक स्थितीपेक्षाही खालावली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
चीनवर भाष्य
चीनसोबतच्या संबंधांचा उल्लेख करताना जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध असामान्य आहेत. सीमेवरील परिस्थिती असामान्य आहे. याबाबत त्यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. डिसएंगेजमेंटची प्रक्रिया पुढे जावी, अशी भारताची इच्छा आहे. जोपर्यंत सीमेवर तणाव आहे तोपर्यंत चीन आणि भारताचे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.