हैदराबाद : इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज करीत असताना स्फोट होऊन लागलेल्या आगीत ८० वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला, तर घरातील तिघे जण जखमी झाले. ही घटना तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यात बुधवारी घडली. मृत व्यक्तीचे नाव रामास्वामी असे आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्नात मुलगा प्रकाश, पत्नी कमलामन्ना आणि सून कृष्णावेणी हे जखमी झाले आहेत.
प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला. वर्षभरातील डेटाबेसमध्ये अशा कोणत्या व्यक्तीने स्कूटर घेतल्याची वा तिची सर्व्हिसिंग केल्याची नोंद नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कुणा ग्राहकाकडून ही सेकंड हँड स्कूटर या व्यक्तीने घेतली होती का, याचा कंपनी शोध घेत आहे.
तज्ज्ञ समिती चौकशी करणार : गडकरी - केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मागील दोन महिन्यांत ई-स्कूटरच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. - काही लोकांनी यात आपला जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले आहेत. ई वाहनांच्या अपघातांबाबत तज्ज्ञांची समिती चौकशी करणार आहे. - हे रोखण्यासाठी मोठी दंडात्मक कारवाई आणि कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत.