पुद्दुचेरीमध्ये एक दुचाकी चालक आणि त्याचं कुटुंब थोडक्यात बचावलं आहे. बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूटर दोन बसच्या मधोमध अडकली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही बस चालकांनी वेळीच ब्रेक दाबल्यानं मोठा अपघात टळला. ही संपूर्ण घटना एका बसच्या मागील बाजूस असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
बसच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला अपघात थरकाप उडवणारा आहे. दोन बसेसच्या मध्ये असलेल्या जागेतून आपण सहज पुढे जाऊ असं चालकाला वाटलं. मात्र त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला. पत्नी आणि चिमुकल्यासह दुचाकीवरून जाणारा इसम दोन बसेसच्या मध्ये अडकला. विरुद्ध दिशांना जात असलेल्या बसेसच्या मध्ये असणारं अंतर अतिशय कमी होतं. त्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न चालकाच्या अंगलट आला.
दोन बसेसमध्ये असलेल्या चिंचोळ्या भागातून पुढे जाण्याचा प्रयत्न फसला. दुचाकी दोन्ही बसेसच्या मधे अडकली. अतिआत्मविश्वास दुचाकीस्वाराला नडला. दुचाकीला दोन्ही बाजूंनी धडक बसली. दुचाकीस्वार आणि त्याच्या पत्नीलादेखील बसेसची धडक बसली. मात्र दोन्ही बसेसच्या चालकांनी ब्रेक दाबल्यानं मोठा अनर्थ टळला.
दुचाकीवरील तिघांना फार इजा झालेली नाही. त्यांना थोड्या जखमा झाल्या आहेत. पुद्दुचेरीतील कलमंडपममध्ये हा अपघात झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्कूटर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या या अपघाताची तीव्रता दोन्ही बसेसच्या चालकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे टळली.