"शिवलिंगावरील विंचू..."; थरूर यांच्या त्या वक्तव्यावरून HC नं फटकारलं, म्हणाले - पंतप्रधानांची बदनामी झाली आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:53 AM2024-08-30T10:53:08+5:302024-08-30T10:53:08+5:30
न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांनी मानहानीच्या कारवाईला आव्हान देणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावली...
काँग्रेस नेते शशी थरूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात ‘शिवलिंगावरील विंचू’ असे भाष्य केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने थरूर यांच्या विरोधातील मानहानीची कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पंतप्रधानांवर करण्यात आलेले आरोप प्रथमदर्शनी घृणास्पद आणि निषेधार्ह आहेत. तसेच, या टिप्पण्यांमुळे पंतप्रधान, भारतीय जनता पक्ष तसेच त्यांचे अधिकारी आणि सदस्य यांची बदनामी झाली आहे. याच बरोबर, न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांनी मानहानीच्या कारवाईला आव्हान देणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावली.
पंतप्रधानांची बदनामी -
खालच्या कोर्टात प्रलंबित मानहानीची कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती मेंदीरत्ता म्हणाले, आयपीसीच्या कलम 500 (मानहानीची शिक्षा) अंतर्गत समन्स जारी करण्यासाठी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पुरेशी सामग्री आहे.
उच्च न्यायालयाने 16 ऑक्टोबर 2020 रोजी मानहानीच्या तक्रारीत तिरुअनंतपुरमचे लोकसभा खासदार शशी थरूर यांच्याविरुद्धच्या फौजदारी कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने गुरुवारी आपला अंतरिम आदेश रद्द केला आणि संबंधित पक्षकारांना 10 सप्टेंबर रोजी खालच्या कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काय म्हणाले न्यायाधीश -
आदेशाची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले होते, ‘कारवाई रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही. कनिष्ठ न्यायालयापुढे कारवाई सुरू ठेवण्याची परवानगी देणे, हे न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल. थरूर यांनी कनिष्ठ न्यायालयाचा 27 एप्रिल, 2019 चा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. भाजप नेते राजीव बब्बर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या तक्रारीत कनिष्ठ न्यायालयाने थरूर यांना आरोपी म्हणून समन्स बजावले होते. 2 नोव्हेंबर 2018 रोजी दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची विनंतीही त्यांनी केली होती.
राजीव बब्बर यांनी कनिष्ठ न्यायालयात थरूर यांच्या विरोधात फोजदारी तक्रार दाखल करत, त्यांच्यामुळे आपल्या धार्मिक भावनां दुखावल्याचे म्हटले होते. न्यायमूर्ती मेंदीरत्ता यांनी 51 पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, "'प्रथम दृष्ट्या, विद्यमान पंतप्रधानांवर करण्यात आलेले आरोप घृणास्पद आणि निषेधार्ह आहेत. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याबरोबरच, यामुळे, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पदाधिकारी व सदस्यांचीही बदनामी होते.
काय म्हणाले होते थरूर -
थरूर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये दावा केला होता की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका निनावी नेत्याने पंतप्रधान मोदींची तुलना 'शिवलिंगावर बसलेल्या विंचवाशी' केली होती. जून 2019 मध्ये थरूर यांना खालच्या न्यायालयाने संबंधित प्रकरणात जामीन मंजूर केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 (मानहानी) आणि 500 (बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती.