नवी दिल्ली – कोरोना विषाणूवर लस येत असल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे, मात्र यातच नवीन संकट उभं राहिलं आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, झारखंड आणि केरळमध्येही बर्ड फ्लूचं थैमान माजलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे तर केरळने या राज्य आपत्ती जाहीर केली आहे.
मध्य प्रदेशात २३ डिसेंबरपासून ३ जानेवारीपर्यंत ३७६ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे, यात सर्वात जास्त १४२ कावळे इंदूरमध्ये मृत पावले आहेत. याशिवाय मंदसौर १००, आगरा-मालवा ११२, खरगोन जिल्ह्यात १३, सीहोर ९ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी सांगितले की, मृत कावळ्याचे नमुने भोपाळच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत, इंदूर आणि मंदसौर येथील नमुने बर्ड फ्लू असल्याची पुष्टी करण्यात आले आहेत.
बर्ड फ्लूच्या पुष्टीनंतर पशू विभागाने अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, भलेही पोल्ट्रीमधील पक्षांमध्ये कोणतेही लक्षण दिसले नाही तरी पोल्ट्री उत्पादन बाजारात, फार्म, जलाशय आणि स्थलांतरित पक्षांवर विशेष लक्ष ठेवण्यात यावं.
हिमाचलदेखील बर्ड फ्लूचा शिकार
हिमाचल प्रदेशच्या कांग्रा येथील पोंग डॅम तलावात हजारो स्थलांतरित पक्षांच्या मृत्यूमागे बर्ड फ्लू रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचं दिसून आले आहे. मृत स्थलांतरित पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या एका प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, ज्याच्या अहवालात एच 5 एन 1 (बर्ड फ्लू) ची पुष्टी झाली आहे. बर्ड फ्लूच्या निदानानंतर प्रशासनाने धरणाजवळील मांस आणि अंडी विक्रीवर बंदी घातली आहे.
हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू
हरियाणाच्या बरवाला भागात रहस्यमयपणे कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे या भागात एव्हीयन फ्लूची भीती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी सुमारे एक लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ५ डिसेंबरपासून कोंबड्यांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली. बरवाला भागातील ११० पोल्ट्री फार्मधील दोन डझन फार्ममधील कोंबड्यांचा रहस्यमय मृत्यू झाला आहे, कोंबड्यांच्या मृत्यूनंतर आता पंचकुला जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. राज्य पशुसंवर्धन विभागाने बाधित फार्ममध्ये आढळलेल्या मृत कोंबड्यांचे ८० नमुने गोळा करून त्यांना जालंधरच्या प्रादेशिक रोग निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
गुजरातच्या जुनागडमध्येही बर्ड फ्लूचा धोका आढळून आला आहे. येथे मानवादर तहसीलच्या बाटवा जवळ ५३ पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. पक्षी मृत अवस्थेत सापडल्याची माहिती मिळताच वनविभागाला मिळताच पथकही घटनास्थळी पोहोचले असून मोठ्या संख्येने पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने सर्व पक्ष्यांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. बर्ड फ्लूमुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची भीती वनविभागाला आहे.
राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये फ्लूची पुष्टी
राजस्थानातील बऱ्याच जिल्ह्यात बर्ड फ्लूचे प्रकरणं आढळली आहेत. झालावाडमध्ये सर्वप्रथम बर्ड फ्लूची पुष्टी झाली. येथे शेकडो कावळे मारले गेले. त्यानंतर आता कोटा, पाली, जयपूर, बारण आणि जोधपूरमध्येही कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या झपाट्याने येत आहेत. २५ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच झालावाडमध्ये कावळ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली, त्यानंतर २७ डिसेंबरला भोपाळच्या प्रयोगशाळेत मृत्यूचे कारण तपासण्यासाठी नमुने पाठविण्यात आले. तपासणीदरम्यान बर्ड फ्लूची पुष्टी मिळाली यानंतर राज्यात कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
बर्ड फ्लू दक्षिणेस पोहोचला
उत्तर आणि मध्य भारतात वाढणाऱ्या बर्ड फ्लू दक्षिणेकडे ठोठावला आहे. केरळमधील अलाप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यात बर्ड फ्लूची नोंद झाली आहे. बर्ड फ्लूच्या प्रकरणाबाबत प्रशासनाला सतर्क करण्यात आलं आहे. कंट्रोल रूम सुरू करण्यात आले असून दोन्ही जिल्ह्यात क्यूआरटी क्विक रिएक्शन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही जिल्ह्यात बरीच बदकं मृत आढळली. भोपाळच्या प्रयोगशाळेत ८ नमुने पाठविण्यात आले होते, त्यापैकी ५ मध्ये फ्लू आढळला. आतापर्यंत सुमारे १७०० बदके मेली आहेत.