आदिलाबाद (तेलंगणा) : टीआरएसचे बीआरएस नाव झाले. आता त्यांना व्हीआरएस द्या. त्यांची गाडी १० वर्षे चालली. एवढी वर्षे चाललेली गाडी गॅरेजमध्ये नव्हे, तर भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांनी धर्मपुरी आणि आदिलाबाद येथील सभेतून मतदारांशी संवाद साधला. राज्यात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असल्यास राज्याचा विकास जलदगतीने होतो, महाराष्ट्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तेलंगणाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘राम मंदिर उभारणीमुळे टीकाकारांची तोंडे बंद’धर्मपुरी येथील भाजप उमेदवार एस. कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी यंदा तेलंगणामध्ये हिंदुत्वाचा जोर दिसत असल्याचे सांगितले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले असून येत्या २ जानेवारी रोजी त्याचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली असल्याचे सांगून विराेधकांच्या इंडिया आघाडीवरही शिंदे यांनी टीका केली.