नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने तेथील नागरिकांना देखील आता देशातील इतर नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले आहे. भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते.
राष्ट्रपतींनी सांगितले की, जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर आता तेथील लोकांना पूर्ण देशातील नागरिकांप्रमाणेच अधिकार मिळणार आहे. तसेच तेथील रहिवाशी आरक्षण आणि नोकरीचा लाभ घेऊ शकतील. त्याचप्रमाणे तिहेरी तलाक रद्द झाल्याने देशातील मुस्लिम महिलांमध्ये न्याय मिळाल्याची भावना आहे.
भारत हे एक स्वातंत्र्य राष्ट्राच्या रूपाने 72 वर्षं पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबरला राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनी दाखवलेल्या जनजागृतीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहचून मतदान केल्याने त्यांनी मतदारांचे मी आभार मानतो. तसेच राज्यसभा आणि लोकसभेत विविध विधेयके पारीत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.