नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात विविध संघटनांनी एकत्र येत आज भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रीय दलित मंचाचे नेते आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ट्विटरवरुन भारत बंदचे आवाहन केले आहे. पंजाबमध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर सरकारी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर इंटरनेट सेवाही सोमवारी (2 एप्रिल) रात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सोमवारी केंद्र सरकार फेरविचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली होती. अॅट्रॉसिटीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांसह अनेक दलित संघटना एकवटल्या आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षांसह अनेक दलित संघटनांनी केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांची भेट घेऊन या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली आहे. तसेच, भाजपाच्या काही दलित नेत्यांनी सुद्धा ही मागणी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याची शक्यता आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (अॅट्रॉसिटी कायदा) तक्रारीची सखोल चौकशी केल्याशिवाय यापुढे कोणाहीविरुद्ध गुन्हा नोंदवता येणार नाही. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंदवला तरी सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी संमतीखेरीज आरोपीस अटकही करता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला होता.
LIVE UPDATES
'भारत बंद'ला हिंसक वळण; मध्य प्रदेशात चार जणांचा मृत्यू
- ग्वाल्हेरमध्ये 19 जण जखमी, यातील दोन जणांची प्रकृती गंभीर. इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
- 01:06 PM मध्य प्रदेशमधल्या मुरैना परिसरात भारत बंदला हिंसक वळण, आंदोलनादरम्यान तरुणाचा गोळी लागून मृत्यू
08:49 AM नंदुरबार : अॅट्रॉसिटी कायद्यासाठी पुकारलेल्या भारत बंद हिंसक वळण, शहादा-पाडदळा बसवर दगडफेक. चार एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे आगारातील सर्व बस फे-या काही कालावधी साठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळांनाही सुट्टी देऊन परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार, नवापूर, तळोद्यात मात्र संमिश्र प्रतिसाद. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात.
09:28 AM बिहारमधील आरामध्ये विविध संघटनांचे रेल रोको आंदोलन.
12:36 PM मुंबई : अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात आंदोलन, भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची वांद्रे येथे निदर्शनं.
12:37 PM जळगाव : अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात आंदोलन, भारत बंददरम्यान दगडफेकीत अंतुर्ली येथे तीन जण जखमी.