गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमध्ये आयोजित एका संमेलनामध्ये घोळ माशाला राज्य मासा घोषित केलं आहे. घोळ एक महागडा आणि दुर्मीळ मासा आहे. जागतिक मत्स्यपालन संमेलन, भारत २०२३ मध्ये त्यांनी ही घोषणा केली. भारताचे पशुपालन, डेअरी आणि मत्स्यपालन राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले की, घोळ माशाला राज्य मासा घोषित केल्याने या माशाला संरक्षण मिळेल. तसेच लोकांमध्ये त्याच्याबाबत जागरुकता निर्माण करण्यास मदत होईल.
प्रचंड महाग असल्याने घोश मासा सी गोल्ड म्हणून ओळखला जातो. हा मासा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामध्ये सापडतो. मात्र वाढतं प्रदूषण आणि बेसुमार मासेमारी यामुळे हा मासा आता विशेषकरून खोल समुद्रात आढळतो. त्यामुळे हा मासा जाळ्यात सापडण्याचं प्रमाण कमी झालंय. घोळ मासा पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांमुळे मौल्यवान आहे. या माशाला औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या उद्योगात खूप मागणी आहे. एवढंच नाही तर याचा वापर वाइन आणि बीयर प्रॉडक्टमध्येही केला जातो.
या माशाचा प्रत्येक अवयव हा उपयुक्त मानला जातो. या माशाचं शास्त्रीय नाव प्रोटोनिबे डायेकेंथस असं आहे. याचा वापर शस्रक्रियेमध्ये लागणारे टाके तयार करण्यासाठी केला जातो. त्याशिवाय या माशाच्या इतर अवयवांचीही वेगळी विक्री होते. कारण त्याचा वापर जगातील अनेक भागांमध्ये मद्यनिर्मितीसाठी केला जातो. मुंबई आणि गुजरातमधील अनेक मच्छिमार घोळ माशाच्या शरीराचे अवयव आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना चढ्या किमतीमध्ये विकतात. भुरकट सोनेरी रंगाच्या या माशाची लांबी सुमारे दीड मीटरपर्यंत असू शकते. मासा जेवढा लांब तेवढी त्याची किंमत अधिक असते. एका मोठ्या घोळ माशाची किंमत ५ लाखांपर्यंत असू शकते. म्हणजेच या माशाच्या किमतीत एख वॅगन-आर खरेदी करता येऊ शकते.