श्रीनगर - जम्मू काश्मीर सरकारने बंदी घातलेल्या जमात ए-इस्लामी संघटनेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या संघटनेशी संलग्नित फलाह-ए-आम ट्रस्ट (एफएटी) द्वारे संचालित शैक्षणिक संस्था पुढील 15 दिवसांत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शाळांना 15 दिवसांत सील करण्यात येणार आहे. या शाळेतील सर्वच विद्यार्थी जवळील सरकारी शाळेत प्रवेश घेतील, असेही सरकारने निर्देश दिले आहेत.
या शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश किंवा नोंदणीची आवश्यकता असणार नाही. हे सर्व विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 2021-2022 मध्ये जवळीस सरकारी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतील. जिल्हा शिक्षण अधिकारी, प्राचार्य आणि झोनल शिक्षणाधिकारी यांची ही जबाबदारी असणार आहे. जमात ए-इस्लामी संस्थेतील विद्यार्थी कंट्टरपंथीयांमध्ये सहभागी झाले आहेत, जे पुढे जाऊन कट्टर फुटीरवादी झाल्याचे एनआयएनच्या तपासात पुढे आले आहे.
शिक्षण विभागाचे मुख्य सचिव बी.के. सिंह यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. तसेच ही शिक्षणसंस्था आता कार्यरत नसल्याची माहितीही सर्वदूर पोहोचविण्याचेही त्यांनी सांगितले. एनआयएच्या तपासातील माहितीनंतर ही जमात ए-इस्लामी ह्या संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एफएटी संचालित सुरू असलेल्या सर्वच शाळा ह्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अधिग्रहित जागांवर बेकायदेशीर सुरू असल्याचेही म्हटले आहे. बंदुकीचा धाक दाखवून या जागा बळकावण्यात आल्या आहेत.