मुंबई, दि.8- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण खुनाची बातमी 5 सप्टेंबरला येऊन थडकली आणि देशभरातून संताप व्यक्त होऊ लागला. सोशल मीडियावर चीड व्यक्त करण्यात येऊ लागली. निषेधाचा तीव्र सूर उमटला. मुख्य म्हणजे या खुनाच्या निमित्ताने विचारस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य आणि व्यापक अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा सुरु झाली. सहिष्णुतेचा हिंसाचारानं घेतलेले आणखी एक बळी असं याचं वर्णन केलं जाऊ लागलं. ही सगळी चर्चा वाचल्यावर आणि वेगवेगळ्या शहरात जागोजागी मेणबत्त्या पेटवून झालेल्या निषेधाची माध्यमांमधून दाखवली गेलेली दृश्यं पाहिल्यावर माझ्या मनात स्वाभाविकपणे काही प्रश्न आले. खरं तर हे प्रश्न नवे नाहीत. जुनेच आहेत. वेळोवेळी मला छळत आले आहेत.
पहिली गोष्ट अशी की खून ही निंदा करण्याजोगीच कृती आहे. कोणत्याही हत्येचं समर्थन होऊ शकत नाही. खुनाच्या प्रत्येक कृतीचा तीव्र निषेध व्हायला हवा. हे करत असताना एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी, सोयीचे असेल तेव्हा निषेधासाठी आवाज उठवायचा आणि सोयीचे नसेल तेव्हा मौनात जाण्याचा मार्ग स्वीकारायचा असा दुटप्पीपणा असता कामा नये. सोयीस्कररित्या बदललेली भूमिका या संदर्भात ढोंगीपणाच असतो.अशा ढोंगीपणाकडे पाहताना मला प्रसिद्ध लेखक 'जॉर्ज ऑर्वेल'च्या प्रसिद्ध 'अॅनिमल फार्म'ची आठवण होते. 'ऑल आर इक्वल, बट सम आर मोअऱ इक्वल 'हे त्याचं वचन आपल्या समाजातील बहुतेकांना कृतीत आणायला आवडतं. किंबहुना तीच अनेकांची प्रवृत्ती असते. हत्येच्या संदर्भात बोलायचं तर सर्वच्या सर्व हत्या समान निंदेच्या धनी हव्यात. महत्त्वाची, कमी महत्त्वाची, दखलपात्र, अदखलपात्र अशा प्रकारची वर्गवारी खुनाच्या बाबतीत असूच शकत नाही. पण आपली सामाजिक प्रतिक्रिया 'सम मर्डर्स आर मोअर इक्वल' अशा स्वरुपाची असते. असा भेदभाव गैर आहे, असं सांगणारा आवाज अभिजनांना रुचत नाही.
कालचंच उदाहरण बघा. गौरी लंकेशच्या खुनाच्या संदर्भात एक सार्वजनिक याचिका किंवा पिटिशन तयार झालं आहे. त्याचं स्वरुप अर्थातच निषेधाचं आहे. मी त्या पिटिशनवर सही करावी, असं सांगणारा एक फोन मला आला. माझी त्यावरची पहिली आणि उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती, की पत्रकार गौरी लंकेशच्या खुनाचा मी तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करतो. मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी करतो.माझी प्रतिक्रिया अशी होती तरी मी त्या पिटिशनवर सही करायला नकार दिला. काय आहे या नकारामागचं कारण? सोयीस्कर भूमिकेचं मला असलेलं वावडं हे त्यामागचं मुख्य कारण. हत्येच्या निषेधाचं पिटिशन असं सिलेक्टिव्ह कसं काय असू शकतं? म्हणून मी फोन करणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट सांगितलं की अशा पिटिशनच्या बाबतीत माझी एक साधी सोपी अपेक्षा आहे. कर्नाटकात हत्या झालेल्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा, केरळात निर्मम हत्या झालेल्या रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या नावांचा समावेशही या पीटिशनमध्ये करा. मी नक्कीच सही करेन. पण कोणत्या खुनाचा निषेध करायचा याचा सिलेक्टिव्ह चॉईस कसा असू शकतो?निंदा करायची तर सर्व हत्यांची करा, ही मागणी असहिष्णू आहे का? उलटपक्षी सिलेक्टिव्ह मर्डर पिटिशन हा देखिल सहिष्णूतेचा खून नाही का ?