- संतोष ठाकूर नवी दिल्ली : पुन्हा आम्हीच सत्तेत येऊ व नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा दावा भाजपा करीत असली, तरी लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही दिवसच शिल्लक असताना नगरविकास मंत्रालयाने निवडणुकांनंतरच्या स्थितीसंदर्भात काम सुरू केले आहे.पंतप्रधान मोदी यांच्यासाठी या मंत्रालयाने दिल्लीच्या लुटियन भागात बंगला शोधणे सुरू केले आहे. माजीपंतप्रधानांना टाइप-आठ पद्धतीचा बंगला दिला जातो. त्यामुळे मंत्रालयाने तसे काही बंगले निश्चित केले आहेत. प्रथेनुसार हे काम करावे लागते. मोदींऐवजी अन्य कोणी नेता पंतप्रधान झाल्यास मोदींच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी ते केले जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंत जे दोन बंगले निश्चित केले. त्यापैकी कृष्ण मेनन मार्गावरील ६-ए हा बंगला आधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना देण्यात आला होता. वाजपेयी यांच्या निधनानंतर तो बंगला रिकामा करण्यात आला आहे. याखेरीज जनपथवरील ९ क्रमांकाचा बंगलाही पाहिला आहे. दहा वर्षे हा बंगला रिकामा आहे. या शेजारीच यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान असून, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो कोणालाही देण्यात आला नव्हता. तुघलक मार्गावरील एक बंगला पाहिला असून, तो बऱ्याच काळापासून शरद यादवांकडे आहे. ३0 जानेवारी मार्ग व अकबर मार्गावरील बंगलेही पाहून ठेवले आहेत. त्यापैकी एक जम्मू-काश्मीर सरकारकडे आहे.मोदी यांच्याखेरीज अन्य नेता पंतप्रधान झाला, तरच मोदींना यापैकी एखादा बंगला त्यांच्या पसंतीनुसार दिला जाईल. त्यांनी मंजुरी दिलेल्या बंगल्याची नंतर दुरुस्ती केली जाईल वा त्यात आवश्यक ते बदल केले जातील. अर्थात, नवा नेता पंतप्रधान होईपर्यंत मोदी जनकल्याण मार्गावरील पंतप्रधानांसाठी असलेल्या निवासस्थानी राहतील.>चुकीचा अर्थ लावला जाऊ नयेएका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा याचा अर्थ लावणे चुकीचे आहे. आम्हाला प्रत्येक निवडणुकीच्या आधी हे काम करावेच लागते. आयत्या वेळी पंचाईत होऊ नये, यासाठी आम्हाला हे काम प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या आधी करावे लागते.
मोदींसाठी नव्या बंगल्याचा शोध सुरू, पुन्हा पंतप्रधान न झाल्यास करावी लागते व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:31 AM