ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पठाणकोट येथील हवाई दलाच्या तऴावर गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा जवानांनी केला असून आणखी दोन दिवस या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरुच राहणार आहे. मात्र या ठिकाणी कोणतेही दहशतवादी नसल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दहशतवाद्यांशी दोन हात करताना आपल्या जवानांनी शोर्याचे काम केले असून कोम्बिंग ऑपरेशन २८ तास चालले. आणखी दोन दिवस सर्च ऑपरेशन सुरुच राहील. सध्या या ठिकाणी एकही दहशतवादी नसून दोन दहशतवाद्यांचे जळलेले मृत्यदेह सापडले आहेत. त्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी दोन दहशतवादी लपले होते, तिथे नुकसान झाले आहे. हल्ला करणा-या दहशतवाद्यांकडे मोठाप्रमाणात शस्त्रसाठा होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचे कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दहशतवाद्यांकडे असलेला शस्त्रसाठा हा पाकिस्तानमधील असल्याचे मनोहर पर्रिकर यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर पठाणकोट हवाई दलाच्या तळावर जवळजवळ ५००० नागरिक असून ते आता सुरक्षित आहेत. तसेच, या हल्लात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांतील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल असेही मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.