मुंबई - गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केल्याचे वृत्त आहे. आज छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
छात्र भारतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत असताना पोलिसांनी जेएनयू छात्र नेते प्रदीप नरवाल आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटी युथ विंगच्या अध्यक्षा रिचा सिंग यांना ताब्यात घेतलं आहे. सध्या इमर्जन्सी काळ सुरु आहे. हा मुद्दा आम्ही संसदेपर्यंत घेऊन जाणार आहे. ही तानाशाही सुरू आहे. सरकारला सगळ्यात जास्त भीती विद्यार्थ्यांकडून आहे. त्यामुळे ते घाबरत आहे अशी प्रतिक्रिया रिचा सिंग यांनी दिली.
परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी उचललं आहे. विलेपार्ल्यात जमावबंदीच कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला. जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
दोन महिन्यांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. काल पर्यंत पोलिसांनी कोणतीही ताकिद दिली नाही. कार्यक्रमाच्या पाच मिनिटांआधी कार्यक्रम रद्द करण्यास पोलिसांनी सांगितले. ते शक्य नसल्याने कार्यक्रमावर ठाम होतो. मात्र सरकारने आवाज दाबण्यासाठी पोलिसांना पुढे करून ही दडपशाही केली असे छात्रभारतीने म्हटले आहे. कार्यक्रमाचे आयोजक सचिन बनसोडे यांना अटक केली असून पोलिसाकडून १४९ ची नोटीस देण्यात आली आहे.