AAP-Congress Seat Sharing Formula: आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा सामना करण्यासाठी इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस वेगवेगळ्या पक्षांसोबत बैठका घेत आहे. दरम्यान, काँग्रेसची आम आदमी पक्षासोबत (आप) दोनदा बैठक झाली. या दोन्ही बैठकीनंतर काँग्रेस आणि आपमध्ये जागावाटपाबाबत निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.
अद्याप अधिकृत घोषणा नाही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोणत्या राज्यात किती जागा लढवायचा, हे दोन्ही पक्षांमध्ये जवळपास निश्चित झाले आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत या सर्व गोष्टींचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून अधिकृत विधान समोर आले नाही.
असा असू शकतो सीट शेअरिंगचा फॉर्म्युला दिल्लीत आप 4 तर काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवू शकते. पंजाबबाबत दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे की, दोघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत, मात्र निवडणुकीपूर्वी अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र आल्यास आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे चर्चा करतील. गुजरातमध्ये काँग्रेस 'आप'ला फक्त 2 जागा देऊ शकते. 'आप'ने 2 हून अधिक जागा मागितल्या आहेत.
हरियाणामध्येही 'आप'ने 2 ते 3 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे, मात्र इथेही काँग्रेस आम आदमी पार्टीला 1 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. गोव्यात काँग्रेस सध्या 'आप'ला एकही जागा देण्यास तयार नाही. त्याचे कारण म्हणजे गोव्यात लोकसभेच्या फक्त 2 जागा आहेत आणि काँग्रेसला दोन्हीवर निवडणूक लढवायची आहे.