ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 15 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरके नगर जागेवर लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. टीटीव्ही दिनाकरन इथून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अण्णाद्रमुकने बुधवारी दिली. अण्णाद्रमुकचा उपसरचिटणीस आणि व्हीके शशिकलाचा भाचा अशी दीनाकरनची ओळख आहे.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला तुरुंगात शिक्षा भोगत असताना तिच्या अनुपस्थितीत दीनाकरन पक्षाचे कामकाज संभाळत आहे. 12 एप्रिलला आरके नगरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. प्रतिष्ठेच्या आरके नगरच्या जागेवर दीनाकरन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घातक ठरु शकतो असे पक्ष कार्यकर्त्यांचे मत आहे.
द्रमुकला ही जागा जिंकण्याचा विश्वास आहे. ओ. पन्नीरसेल्वम गटाकडून इथे मधुसूदन यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. जयललितांच्या भाचीने सुद्धा इथे प्रचार सुरु केला असून त्या पन्नीरसेल्वम गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. चेन्नईतील आरके नगर विधानसभा मतदारसंघ अण्णाद्रमुकचा बालेकिल्ला आहे. मागच्यावेळी जयललिता यांनी इथून तब्बल 40 हजारच्या फरकाने द्रमुकच्या उमेदवारावर विजय मिळवला होता.