मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांना सोबत घेतले नाही. अखिलेश यादव यांच्या सपाची काही ठिकाणी ताकद होती, तरीही त्यांना काँग्रेसने भाव दिला नव्हता. यामुळे या अनुभवावरून अखिलेश यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. काँग्रेसने आघाडीची ६ डिसेंबरला बैठक बोलावली होती, त्यावरून अखिलेश यांनी आधी जागावाटप नंतर पुढची चर्चा अशी अटच घातल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे.
इंडिया आघाडीच्या काँग्रेसने ६ डिसेंबरला बोलविलेल्या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील येण्यास नकार दिला होता. यावर आता ही बैठक १७ डिसेंबरला घेण्याचे लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस स्थानिक पक्षांना भाव देत नसल्याने व पाच राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याने या पक्षांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.
अखिलेश यांनी आधी जागा वाटप करावे, त्याशिवाय पुढे चर्चा करणार नसल्याची अटच घातली आहे. ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, त्या पक्षाचा उमेदवार द्यावा असे इंडिया आघाडीच्या बैठकीत सुरुवातीला ठरले होते. याच सुत्रावर आघाडीला पुढे जावे लागेल असे अखिलेश यांनी म्हटले आहे. यापूर्वी अखिलेश यांनी काहींचे गर्वहरण झाले असेल असा टोला काँग्रेसला लगावला होता.
अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाला जास्त जागा देण्याच्या मन:स्थितीत नाहीएत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती अमेठी आणि रायबरेलीपेक्षा चांगली नाही. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाला आता फक्त त्या मतदारसंघांपुरतेच मर्यादित राहावे लागणार आहे, असे सपा प्रवक्ते फखरुल हसन चंद यांनी सांगितले होते.
भाजपाचा मुकाबला करण्यासाठी २६ पक्ष एकत्र-लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, TMC, RJD, JDU, AAP, SP, DMK असे २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या युतीला 'इंडिया' युती असे नाव देण्यात आले आहे. 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली. दुसरी बैठक बेंगळुरू येथे तर तिसरी बैठक मुंबईत झाली. यानंतर खर्गेंनी यांनी ६ डिसेंबर रोजी दिल्लीत चौथी बैठक बोलावली होती.