नवी दिल्ली : इशरत जहां प्रकरणात संपुआ सरकारने प्रतिज्ञापत्रात बदल केल्याबद्दल भाजपकडून काँग्रेसवर टीका होत असताना, काँग्रेसचे नेते व माजी कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी मात्र या बदलाचे गुरुवारी जोरदार समर्थन केले. इंटेलिजन्स ब्युरो आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आधी एक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले होते. पण प्रत्यक्ष चौकशीमध्ये वेगळी माहिती समोर आल्याने प्रतिज्ञापत्रात बदल करावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले.पहिल्या प्रतिज्ञापत्रात चकमकीमध्ये मारली गेलेली इशरत जहां आणि अन्य तिघेही लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असल्याचे नमूद करण्यात आले होते. ती माहिती गुप्तचर यंत्रणेकडून सरकारकडे आली होती. पण नंतरच्या चौकशीत त्याहून वेगळी माहिती समोर आल्याने प्रतिज्ञापत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मोईली म्हणाले की अनेकदा असे बदल केले जातात. तो काही गुन्हा असू शकत नाही. चुकीची माहिती न्यायालयासमोर गेली असती, तर आणखी अडचणी निर्माण झाल्या असत्या. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे समर्थन करताना ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी त्या चौघांना गुजरातमध्ये येण्यास भाग पाडले होते, हे लक्षात घेतल्यास ती चकमक बनावट असल्याचेच लक्षात येईल. आरोपींना वा संशयितांना अटक करून नंतर चकमकीच्या नावाखाली ठार मारायचे, हे कायद्यात कोठेच बसत नाही, असे नमूद करून त्या काळात अन्य कोणत्याही राज्यापेक्षा तिथेच सातत्याने चकमकींचे प्रमाण वाढत होते, हे विसरून चालणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इशरतप्रकरणी दुसरे प्रतिज्ञापत्र योग्यच
By admin | Published: March 04, 2016 2:23 AM