नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच आपल्या बहुचर्चित भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातपासून सुरू होऊन ईशान्येकडील राज्य मेघालयपर्यंत सुरू राहील, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राहुल गांधींनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. काँग्रेसने भारत जोडो यात्रा अत्यंत यशस्वी काढण्यात आली होती. कर्नाटकात ज्या भागातून भारत जोडो यात्रा काढली होती. त्याठिकाणी नुकत्याच झालेल्या विधानसभेत काँग्रेसने बाजी मारली होती.
या यात्रेनंतर लोकांच्या मनात राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा 4,000 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा राहुल गांधी कधीपासून सुरू करणार याबाबत कोणतीही तारीख आणि मार्ग समोर आलेला नाही.
राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या मते, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपचा मुकाबला करण्यासाठी नवी ऊर्जा दिली आहे. याचबरोबर, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा फायदा काँग्रेसला घ्यायला नक्कीच आवडेल.