अहमदाबाद : गत काही दिवसांपूर्वी हिंसक वळण घेतलेल्या गुजरातेतील पटेल समाजाच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा मंगळवारपासून सुरतेतून सुरू होणार आहे. पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजक हार्दिक पटेल यांनी सोमवारी ही माहिती दिली.पटेल समाजास ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी समितीने आंदोलन छेडले आहे. गत २५ आॅगस्टला या मागणीसाठी पटेल समाजाची अहमदाबादेत भव्य रॅली पार पडली होती. मात्र या रॅलीनंतर अहमदाबाद, सूरत, राजकोट अशा अनेक शहरात हिंसाचार उफाळून आला होता. यात १० जणांचा बळी गेला होता.हार्दिक पटेल या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. दिल्लीतून अहमदाबादेत दाखल झाल्यानंतर हार्दिक यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा मंगळवारपासून सूरतेत सुरू होत असल्याचे जाहीर केले. आरक्षण आंदोलनासाठी विविध समाजांचा पाठिंबा मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच येत्या दिवसांत देशाच्या विविध भागांत रॅली करून आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनाचा दुसरा टप्पा संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. शिवाय आगामी कार्यक्रम तसेच रॅलींची मंगळवारी अधिकृत घोषणा केली जाईल, असेही सांगितले.देखरेखीची गरज नाहीअहमदाबाद : पटेल आंदोलनादरम्यान ३२ वर्षीय श्वेतांग पटेल या व्यक्तीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. अशास्थितीत त्यावर न्यायालयीन निगराणीची गरज नाही, असे सांगत अशी मागणी करणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. न्यायालयाने गुरुवारी श्वेतांगची आई प्रभाबेन हिच्या याचिकेवर श्वेतांगच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचा आदेश दिला होता. (वृत्तसंस्था)
पटेल आरक्षणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरतेतून
By admin | Published: August 31, 2015 11:23 PM