ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १५ - दिल्ली सरकारने सुरु केलेल्या सम-विषम योजनेच्या दुस-या टप्प्याला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी केजरीवाल सरकारचा हा प्रयत्न आहे. मात्र वाढती गर्मी आणि शाळा सुरु असल्याने दिल्लीकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीकर चांगला प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी शाळकरी मुलांना तसंच एकट्या किंवा मुलांसोबत जाणा-या महिलांना सूट देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही योजना लागू करण्यात येणार आहे.
नियमांच उल्लंघन करणा-यांकडून दंड वसूल करण्यासाठी सरकारने 120 पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यावेळी 110 पथक पाठवण्यात आली होती. स्वयंसेवकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली असून 5300 स्वयंसेवक रस्त्यावर असणार आहेत. लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं तसंच नियमांच पालन करण्याचं आवाहन स्वयंसेवक करणार आहेत.
120 पथकांमध्ये माजी सैनिकांचादेखील समावेश असणार आहे. वाहतूक विभागातर्फे विशेष माजी सैनिकांची वाहतूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक विभागातील अंमलबजावणी पथकाचे 180 कर्मचारी देखील यात सहभागी असून नियमांचं उल्लंघन करणा-यांकडून 2 हजारांचा दंड वसूल करण्याच काम करणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील योजनेशी तुलना करता यावेळी दिल्लीतील हवामान वेगळे आहे ज्याचा परिणाम योजनेवर होऊ शकतो. तापमान जास्त असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करता कारने प्रवास करण्यावर लोकांचा भर असेल. 'यावेळी सम-विषम योजनेत अनेक अडचणी आहेत याची आम्हाला कल्पना आहे मात्र लोकांवर आमचा विश्वास आहे', असं वाहतूक मंत्री गोपाल राय बोलले आहेत.
गेल्यावेळीप्रमाणे यावेळीदेखील दुचाकी वाहनांना सूट देण्यात आली आहे. मात्र यावेळी शाळकरी मुलांना घेऊन जाणा-या वाहनांनाही सूट देण्यात आली आहे, जी गेल्यावेळी देण्यात आली नव्हती. दुसरा टप्पादेखील जर पहिल्या टप्प्याप्रमाणे यशस्वी झाला तर प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसांसाठी ही योजना लागू केली जाईल अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.
Odd even starts today. Lets all join hands and resolve to make it a success.— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 15, 2016