Monkeypox: अलर्ट! केरळमध्ये मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला, कोणती काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:21 PM2022-07-18T16:21:36+5:302022-07-18T16:22:09+5:30
केरळमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये पहिल्यांदाच एक मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला होता.
नवी दिल्ली-
केरळमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये पहिल्यांदाच एक मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला होता. आता आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
देशात मंकीपॉक्सचे जास्त रुग्ण अद्याप आढळून आलेले नसले तरी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सर्व देशांना सावधानतेचा इशारा याआधीच दिला आहे. जगातील २७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे जवळपास ८०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब अशी की हा रोग अशा ठिकाणी पसरतोय ज्याठिकाणी व्हायरस अजूनही प्राथमिक पातळीवर देखील नाही.
"The second positive case of Monkey Pox in Kerala has been confirmed in Kannur District," confirms State Health Ministry
— ANI (@ANI) July 18, 2022
केरळमध्ये आढळून आलेल्या दोन्ही प्रकरणांचं परदेशाशी कनेक्शन असल्याचं निष्पन्न झालं आहे. केरळमध्ये आढळून आलेला पहिला रुग्ण परदेशातून भारतात आला होता. त्यानंतर त्याला ताप आणि शरीरात वेदना सुरू झाल्या होत्या. आता दुसऱ्या प्रकरणातंही परदेशवारीच कनेक्शन समोर आलं आहे. संबंधित रुग्ण नुकताच दुबईहून भारतात परतला होता. महत्वाची बाब अशी की भारतात परतून या व्यक्तीला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. पण त्याला आता मंकीपॉक्सची लक्षणं जाणवू लागली.
कोणती काळजी घ्याल?
तज्ज्ञांच्या मतानुसार मंकीपॉक्सपासून घाबरण्याची काहीच गरज नाही. फक्त आवश्यक अशी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. मंकीपॉक्स कोरोना विषाणूसारखा वेगानं पसरत नाही. याचं गांभीर्य कोरोनापेक्षा कमी असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाप्रमाणे वेगानं पसरण्याची क्षमता मंकीपॉक्समध्ये नाही, असं केरळच्या चिकित्सा तज्ज्ञ डॉक्टर राजीव जयदेवन यांनी सांगितलं. युरोप आणि अमेरिकेत यंदाच्या वर्षात तब्बल ६ हजार रुग्ण आढळले आहेत. पण यातील एकाचाही मृत्यू झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं. आफ्रिकेच्या काही ठिकाणी मंकीपॉक्समुळे मृत्यू झालेल्यांची माहिती समोर आली पण या रोगाचा कांगो स्ट्रेन इतर कुठे पसरल्याचं अद्याप समोर आलेलं नाही.
ताप, डोकेदुखी, सूज येणे आणि थकवा ही मंकीपॉक्सची प्राथमिक लक्षणं आहेत. ताप येऊन अंगभर पुरळ उठून कालांतराने त्याचे फोडांत रुपांतर होते. अंगदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा हेही लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास गुंतागुंत वाढत जाते.
मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे. आजार टाळण्यासाठी घर-परिसर स्वच्छ ठेवावा. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.