नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र आज सोमवारपासून सुरू होत आहे. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याने, हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. तथापि, सरकारनेही विरोधकांचा आक्रमक पद्धतीनेच मुकाबला करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारने या दुसऱ्या सत्रासाठी मोठा अजेंडा तयार केला आहे, ज्यात लोकसभेत १३ आणि राज्यसभेत ११ विधेयके पारित करण्याचा समावेश आहे. तथापि, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जीएसटीसारखे विधेयक पुढे रेटणे शक्य होणार नाही, याची सरकारला जाणीव आहे. डावे पक्ष, संजद आणि अन्य विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेस उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे संघराज्य चौकटीवर हल्ला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना अनेक राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, असे सांगत काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपाने केली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९५१ पासून देशात १११ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यात भाजपा वा रालोआ सत्तेत नसताना ९१ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. उत्तराखंड मुद्यावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही नियम ५६ अंतर्गत स्थगन प्रस्ताव आणू, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, या बैठकीत सदस्यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यात उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्यासह देशाच्या विविध भागांमध्ये पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई या मुद्यांचाही समावेश आहे, असे खरगे म्हणाले.
संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र आजपासून
By admin | Published: April 25, 2016 3:42 AM