नवी दिल्ली : डॉक्टरांनी वारंवार सावधानतेचा इशारा दिल्यानंतरही कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकार तसेच प्रशासन आणि लोकांनीही काहीसे दुर्लक्ष केल्याने देशापुढे सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर संकट ओढवले आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी व्यक्त केले. तज्ज्ञ आता देशात तिसरी लाटही येऊ शकते असे सांगत असतील तर त्याला अजिबात घाबरून न जाता तयारीने या संकटाला सामोरे जात हे युद्ध जिंकले पाहिजे, असे आवाहनही मोहन भागवत यांनी नागरिकांना केले.
कोरोनाच्या या गंभीर संकटाच्या काळात लोकांमध्ये सकारात्मता वाढावी, त्यांच्यात आत्मविश्वास यावा या हेतूने संघाच्या वतीने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ ही व्याख्यानांची मालिका आयोजित केली जात आहे. यातील व्याख्यानात मोहन भागवत बोलत होते. या ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात भागवत म्हणाले की, देशाच्या सरकार आणि लोकांनी दुर्लक्ष केल्यानेच देशात कोरोनाची दुसरी लाट भविष्याच्या विचार करून लोकांनी तसेच सरकारने सध्या सुरु असलेल्या घडामोडींमधून योग्य तो बोध घेतला पाहिजे. देशाला भेडसावत असलेल्या सगळ्या अडचणींना बाजूला सारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे.
यावेळी मोहन भागवत यांनी नागरिकांना कायम वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, तुमच्यापर्यंत येणाऱ्या कोणत्याही नव्या विचाराचे वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच मगच त्याचा स्वीकार करा. संघाच्या वतीने ११ मे पासून या व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. शुक्रवारी आयोजित केलेल्या व्याख्यानात विप्रोचे ग्रुपचे संस्थापक अझिम प्रेमजी, आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनीही आपले विचार मांडले.