नवी दिल्ली : भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत थांबेल आणि जवळपास सहा ते आठ महिन्यांनी कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि औद्योगिकी विभागाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारलाही समितीने सावध राहण्यास सांगितले आहे. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला कोरोनाचे रोज दीड लाख रुग्ण सापडणार आहेत. जूनच्या शेवटी रोज २० हजार नवे रुग्ण सापडतील. जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपण्याची शक्यता आहे.
समितीचे सदस्य आणि आयआयटीचे (कानपूर) प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात आणि हरियाणाशिवाय दिल्ली आणि गोवा राज्यांत कोरोनाने उसळी घेतली आहे. तामिळनाडूत २९ ते ३१ मे या कालावधीत कोरोना डोके वर काढू शकतो. पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांत सध्या कोरोनाचे पीक येणे बाकी आहे. आसाममध्ये २०-२१ मे, मेघालय ३० मे, त्रिपुरा २६-२७ मेपर्यंत कोरोनाचा कहर वाढू शकतो.
वैज्ञानिक काय म्हणतात?या वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार पुढील सहा किंवा आठ महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले तर ही लाट स्थानिक असेल. त्यामुळे अनेक लोक प्रभावित होण्याची शक्यता कमी आहे.कमीत कमी ऑक्टोबर २०२१ पर्यंत तिसरी लाट येणार नाही.
भारताला ६० दशलक्ष लस मात्रा द्या-जॅकसनअमेरिकेतील नागरी हक्क नेते रेव्ह जेस्सी जॅकसन यांनी अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने भारताला ॲस्ट्राझेनेका लसीच्या ६० दशलक्ष मात्रा द्याव्यात, असे आवाहन येथे केले. ते म्हणाले, ‘आज संपूर्ण जग भारतासाठी प्रार्थना करीत आहे.