पुरी : ओडिशाच्या पुरिस्थित जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले आहे. याचदरम्यान, मंदिराच्या रत्न भंडाराच्या आतील भागात एक गुप्त बोगदा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुप्ता बोगदा खरेच आहे का हे तपासण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकते, असे पुरीचे राजा आणि गजपती महाराज दिव्या सिंह देव यांनी म्हटले आहे.
रत्नभंडारच्या आतील चेंबरमध्ये बोगदा किंवा गुप्त खोली असण्याची शक्यता असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देव यांनी याबाबत माहिती दिली.
लेझर स्कॅन...
अनेक स्थानिकांचा आणि भाविकांना रत्न भंडारच्या आतल्या खोलीत एक गुप्त बोगदा आहे, असा विश्वास आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गुप्ता बोगदा आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘लेझर स्कॅन’ सारखी प्रगत उपकरणे वापरू शकते.
अशा तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण केल्याने बोगद्यासारख्या कोणत्याही गोष्टीची माहिती मिळू शकते, असे ते म्हणाले.
माजी न्यायाधीश म्हणतात...
देखरेख समितीचे अध्यक्ष, माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ म्हणाले की, आमच्या तपासणीदरम्यान आम्हाला गुप्त बोगद्याचे काही विशेष पुरावे मिळाले नाहीत. रथ यांनी १० सदस्यांसोबत रत्न भंडारामध्ये सात तासांपेक्षा अधिक वेळ घालविला, मात्र, त्यांना बोगदा आढळून आला नाही. सोशल मीडियावर या संदर्भात चुकीची माहिती पसरविणे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
रत्न भंडारच्या भिंतीला तडा
nसमितीचे सदस्य आणि सेवादार दुर्गा दासमहापात्रा म्हणाले की, आम्हाला रत्न भंडारात कोणताही बोगदा किंवा गुप्त खोली आढळून आली नाही. रत्न भंडार अंदाजे २० फूट उंच आणि १४ फूट लांब आहे.
nतपासणीदरम्यान समोर आलेल्या काही किरकोळ समस्या त्यांनी नमूद केल्या. ते म्हणाले की, छतावरून अनेक लहान-मोठे दगड पडले होते आणि रत्न भंडारच्या भिंतीला तडा गेला होता. फरशी भिंतीइतकी ओलसर नव्हती, असे त्यांनी सांगितले.