खरगपूर (प. बंगाल) : बड्या कंपन्यांकडून आयआयटीयन्सना दिले जाणारे पगाराचे गलेलठ्ठ पॅकेज हा चर्चेचा विषय ठरून, निवड न झालेल्या विद्यार्थ्यांवर पालक आणि समाजाकडून येणारा दबाव पाहता, देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान संस्था असलेल्या आयआयटीने अशा पॅकेजची घोषणा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.आजवर आयटीकडून पॅकेज उघड केले जात होते. मात्र, विद्यार्थ्यांची नावे जाहीर होत नव्हती. पॅकेजनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी श्रेष्ठत्वाची भावना, पालक व समाजाकडून येणारा अनावश्यक दबाव वाढीस लागतो, असे आयआयटी खरगपूरच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रा. सुधीरकुमार बारई यांनी स्पष्ट केले.कौटुंबिक सुरक्षा महत्त्वाची... उत्तीर्ण होऊन नोकरीला लागणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण मोठ्या खंडणीसाठी या विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा धोका असतो. कोणत्याही आयआयटीकडून दिली जाणारी पगाराच्या आकडेवारीची प्रसिद्धी माध्यमांकडून दखल घेतली जाते. यावेळी कोणतीही संस्था ही आकडेवारी जाहीर करणार नसल्यामुळे त्याला सत्यतेची जोड लाभणार नाही, असेही बारई यांनी स्पष्ट केले. अलीकडे आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याने खरगपूर येथे इंटर्नशीप पूर्ण करताच, वार्षिक दोन कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा स्वत:हून गुगलवर केली होती. ‘विद्यार्थी स्वत:हून वाच्यता करीत असतील, तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही,’ असेही ते म्हणाले.
आयआयटीच्या गलेलठ्ठ पॅकेजबाबत आता गुप्तता
By admin | Published: December 03, 2015 3:54 AM