- हरीश गुप्ता नवी दिल्ली : परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील. या पदासाठी १५४ जणांचे दावे होते, तसेच पाच माहिती आयुक्तपदांसाठी ३५५ जण इच्छुक होते. सिन्हा हे सध्याच माहिती आयुक्तपदी आहेत. दुसरे म्हणजे सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालपद भूषविलेले दिवंगत जनरल एस. के. सिन्हा यांचे चिरंजीव आहेत. नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माहूरकर हे इंडिया टुडे ग्रुपमध्ये डेप्युटी एडिटर असून ते संघ परिवारालाही जवळचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. या समितीने सिन्हा यांचे नाव अर्जांची बारकाईने छाननी करून अंतिम केले. या जागा रिक्त असल्यामुळे मुख्य माहिती आयुक्तालयात माहितीच्या अधिकाराची हजारो प्रकरणे आणि अपिलांची ३७ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे साचून राहिली होती.
मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 5:06 AM