Security Breach in Lok Sabha: आज संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक घडली. लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुण अचानक संसदेत घुसले आणि त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून सभापतींच्या खुर्चीकडे धाव घेतली आणि स्मोक कँडल फोडला. सागर आणि मनोरंजन, अशी या दोन तरुणांची नावे आहेत. यातील मनोरंजन, हा म्हैसूरचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. आपल्या मुलाचे कृत्य समजल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
संबंधित बातमी- 'सुरक्षा रक्षकांनी नाही तर खासदारांनी आरोपींना पकडले', अधीर रंजन यांनी सांगितली संपूर्ण घटना
आरोपी तरुणाची ओळख पटल्यानंतर दिल्ली पोलिसांनी म्हैसूर पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीची माहिती म्हैसूर पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर म्हैसूर पोलिसांनी मनोरंजनच्या विजयनगर येथील घर गाठले आणि चौकशी सुरू केली आहे. एसीपी गजेंद्र प्रसाद आणि विजयनगर पीआय सुरेश यांनी मनोरंजनचे वडील देवराज गौडा यांच्याकडून त्याची माहिती घेतली.
मुलाला फाशी द्या...आपल्या मुलाचे कृत्य समजल्यानंतर देवराज गौडा म्हणाले की, मनोरंजनने बीईचे शिक्षण पूर्ण केले आहे. एचडी देवेगौडा यांच्यामुळेच मुलाला बीईचे अॅडमिशन मिळाले होते. तो नेहमी दिल्लीला जायचा. आमची कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्या मुलाने असे का केले, हे मला माहीत नाही. असे कृत्य करणारा माझा मुलगा असूच शकत नाही. त्याने चूक केली असेल तर त्याला फाशी द्यावी.
प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा काय म्हणाले?प्रेक्षक गॅलरीत उपस्थित प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा यांनी सांगितले की, आम्ही लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी आलो होतो. आम्ही पहिल्या गॅलरीत होतो. आरोपी गॅलरी दोनमध्ये होता. त्याने अचानक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि स्मोक बॉम्ब फोडले. खासदारांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला, यानंतर आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.