फिरोजपूर – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. बुधवारी पंजाबच्या फिरोजपूर इथं त्यांची रॅली होती. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
सुरुवातीला रॅली रद्द होण्यामागे पावसाचं कारण देण्यात आले. परंतु आता रॅली रद्द होण्यामागे सुरक्षेचं कारण देण्यात आले आहे. गृह मंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले असून पंजाब सरकारकडे उत्तर मागितलं आहे. पंजाबमध्ये भाजपा आक्रमक झाली असून त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा राजीनामा मागितला आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलंय की, पंतप्रधान मोदी सकाळी भटिंडाला पोहचले होते. त्याठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते.
मात्र पाऊस आणि खराब वातावरणामुळे पंतप्रधान मोदींना २० मिनिटं वाट पाहावी लागली. त्यानंतरही वातावरण तसेच राहिल्याने रस्ते मार्गाने मोदींनी जाण्याचा निर्णय घेतला. रस्ते मार्गाने जाण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार होता. त्याबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजुरी घेतली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा राष्ट्रीय स्मारकाच्या ३० किमी अंतरावर होता. तेव्हा रस्त्यात असणाऱ्या उड्डाणपूलावर मोदींचा ताफा पोहचला तेव्हा अचानक रस्त्यावर शेतकऱ्यांनी ताफा रोखला. या उड्डाणपूलावर जवळपास १५-२० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयाने सांगितले.
शेतकरी आक्रमक
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर भाजपाच्या प्रत्येक रॅलीला विरोध करणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांनी याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळाही जाळला. कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांमधील संताप कमी होईल असं वाटत होतं परंतु पंजाबमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पंतप्रधान मोदींची रॅली असल्यानं शेतकरी विरोध करणार असल्याचं समजलं. मात्र मंगळवारी रात्री शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यात बैठक झाली. त्यात १५ मार्च रोजी पंतप्रधान मोदींसोबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र तरीही शेतकऱ्यांनी आज पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला.