तिरुवेदांती (तामिळनाडू) : देशाच्या भूभागाच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारची जेवढी कटिबद्धता आहे तेवढीच ती शांततेसाठी आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तथापि, सशस्त्र सैन्याला शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यासाठी सरकार तयार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.तामिळनाडूच्या तिरुवेदांतीमध्ये आयोजित संरक्षण प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. भारतासोबतच्या ४ हजार किमी सीमेवर आणि प्रशांत महासागरात चीनकडून हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही टिपणी केली. संरक्षण उत्पादनांना प्राधान्य देण्याच्या सरकारी धोरणावर बोलताना त्यांनी यापूर्वीच्या यूपीए सरकारवर टीका केली. संरक्षण क्षेत्राला त्यांनी झुकते माप न दिल्याचा प्रतिकूल परिणाम संरक्षण क्षेत्रावर झाला, असे ते म्हणाले. विदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोदी म्हणाले, आळस, अक्षमता आणि काही स्वार्थामुळे देशाचे कशा प्रकारे नुकसान होऊ शकते, ते आम्ही पाहिले आहे. मात्र, आता असे होणार नाही. दोन वर्षांतून एकदा आयोजित होणारे हे चार दिवसीय प्रदर्शन बुधवारीच सुरू झाले. पण, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी याचे औपचारिक उद्घाटन केले. या कार्यक्रमास संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि अनेक देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. कावेरी पाणीवाटप वादाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत आलेल्या मोदी यांनी सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण आणि पूर्वीच्या सरकारकडून मध्यम आकाराचे लढाऊ विमाने खरेदीच्या अयशस्वी प्रयत्नांचाही उल्लेख केला.>खरेदी प्रक्रिया सुरूमोदी म्हणाले, आम्ही ११०नव्या लढाऊ विमानांची खरेदीप्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी प्रारंभिक निविदा जारी केली आहे. ते म्हणाले, मे २०१४पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात ५७.७ कोटी डॉलरची होती. चार वर्षांच्या काळात आम्ही १.३ अब्ज डॉलरपेक्षाही अधिकनिर्यात केली आहे.
सुरक्षेप्रमाणेच शांततेसाठी कटिबद्ध, संरक्षण प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 4:14 AM