ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २६ - संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता व औचित्य टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत व्यापक प्रतिनिधित्व व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायम सदस्यत्वासाठी राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास परिषदेमध्ये ते बोलत होते. 'सध्याच्या जगातील वास्तविकतेचा विचार केल्यास संयुक्त राष्ट्रसंघांच्या रचनेते बदल केले पाहिजेत तसेच प्रत्येकाला सुरक्षित वाटेल अशा जगाची निर्मिती आपण केली पाहिजे,' असे ते म्हणाले. तसेच 'मानवतेचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवले पाहिजे. जगात शांतता कायम राहण्यासाठी गरिबी हटवणे आवश्यक आहे, त्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवटच्या स्तरातील व्यक्तींपर्यंत लाभ पोहोचवणे हेच भारत व संयुक्त राष्ट्रसंघ दोघांचेही उद्दिष्ट आहे. गरिबी निर्मूलनाचे, गरिबांना सशक्त बनवण्याचे आमचे (भारत) ध्येय असून त्यासाठीच कौशल्यविकासाची कास धरण्यात आली आहे. तसेच भारतात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. पर्यावरण सुरक्षेसाठी सर्वांनीच संकल्प करून वैश्विक जनभागीदारी निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे सांगत हवामान बदलासंदर्भातील उद्दिष्टांची पूर्ती सर्व विकसित देशांनी केली पाहिजे, असे मोदी म्हणाले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी पुढील पिढीला जागरूक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.