नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर या संवेदनशील आणि सीमेवरील केंद्रशासित प्रदेशात सुरक्षाव्यवस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विविध केंद्रीय निमलष्करी दलांचे १० हजार जवान तात्काळ तेथून काढून घेण्यात येणार आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दलांमध्ये आतापर्यंत एकाच वेळी केली जाणारी ही सर्वात मोठी कपात असेल. जम्मू-काश्मीरमध्ये एरवी मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात असतातच.गेल्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी त्या राज्याचा विशेष दर्र्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर तेथे केंद्रीय निमलष्करी दलांच्या वाढीव तुकड्या पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच वाढीव तुकड्या आता तेथून काढून घेण्यात येणार आहेत. या कपातीनंतरही तेथे सर्व निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ६० हजार जवान व अधिकारी सुरक्षा कार्यासाठी तैनात राहतील, असे सूत्रांनी सांगितले.गेल्या मे महिन्यात १०, तर डिसेंबरमध्ये ७० तुकड्या काश्मीरमधून काढून घेण्यात आल्या होत्या. एका तुकडीत १०० जवान असतात. म्हणजे आताची कपात धरून गेल्या वर्षभरातील कपात एकूण १८ हजारांची असेल. तेथील सुरक्षा परिस्थितीचा समग्र आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, संबंधित केंद्रीय निमलष्करी दलाने कमी केलेल्या तुकड्यांना विमानाने काश्मीरमधून देशाच्या अन्य भागांतील त्यांच्या छावण्यांमध्ये नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय घेताना सुरक्षेच्या निकडीखेरीज दीर्घकाळ तेथे राहिलेल्या तुकड्यांना आराम व फेरप्रशिक्षण देण्याची गरज, काश्मीरमधील तोंडावर आलेला कडक हिवाळा याचाही विचार केला गेला आहे. बºयाच तुकड्या काश्मीरमध्ये पक्क्या इमारतींमध्ये नव्हे, तर तंबू-राहुट्यांमध्ये राहत होत्या.
काश्मीरमध्ये सुरक्षा कपात, १० हजार जवान काढून घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:38 AM