विशाखापट्टणम - आंध प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आज सकाळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. कोयूर मंडल परिक्षेत्रातील घटदाट जंगलात नक्षलविरोधी ग्रेहाऊंड फोर्सच्या जवानांसोबत नलक्षवाद्यांची चकमक झाली. त्यामध्ये 6 जणांना ठार करण्यात आले असून त्यापैकी एकाची ओळख पटली आहे. मृत नक्षलवादी तेलंगणा राज्याचा डीसीएम कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे.
डीजीपी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर सर्च ऑपरेशन सुरु असून आत्तापर्यंत 6 मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये, मृतदेह 1 महिलेचा आहे. घटनास्थळावरुन हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ग्रेहाऊंड फोर्सचे जवानांना कोयूर मंडल परसरातील घनदाट जंगलात काही टॉप नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर, फोर्सने सर्च ऑपरेशन सुरू केले होते.
जवानांचे सर्च ऑपरेशन सुरू असतानाच अचानक माम्पा ठाणे क्षेत्र तेगलामेट्टा परिसरात नक्षलवाद्यांच्या एका ग्रुपने ग्रेहाऊंडच्या जवानांवर हल्ला केला. त्यानंतर, जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन एके 47 सह काही हत्यारं ताब्यात घेतली आहेत.