श्रीनगर - गेल्या काही काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लष्कराच्या जवानांना चकमा देण्यासाठी दहशतवादीही विविध युक्त्या योजू लागले आहेत. मागच्या काही दहशतवादी घटनांदरम्यान दहशतवाद्यांनी बुरखा परिधान करून हल्ला करण्याची चाल खेळली असून, दहशतवाद्यांच्या या चालीमुळे लष्कराच्या चिंतेत वाढ झाली आहे. सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बुरखा परिधान करून हल्ला केल्याच्या गेल्या वर्षभरात डझनभर घटना घडल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र हा आकडा मोठा असू शकतो. दहशतवाद्यांनी अवलंबलेल्या या तंत्रामुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आता सर्च ऑपरेशन हाती घेताना महिला अधिकाऱ्यांचीही मदत घेण्याचा विचार सुरक्षा दलांकडून सुरू आहे. दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम आणि दहशतवाद्यांना घेरल्यानंतर स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणावर समोर येतात. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचा फायदा घेत दहशतवादी तेथून पसार होण्यात यशस्वी झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच यावर्षी स्वातंत्र्य दिनी झालेल्या चकमकीदरम्यान उडालेल्या गोंधळात दोन महिलांना गोळ्या लागल्या होत्या. मात्र सुरक्षा दलांनी प्रसंगावधान दाखवत दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. चकमकीनंतर या दहशतवाद्यांचे मृतदेह बुरखा घातलेल्या अवस्थेत सापडले होते. दरम्यान, याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात बुरखाधारी दहशतवाद्यांनी आपल्या सहकाऱ्याला रुग्णालयातून पळवून नेले होते.
बुरखाधारी दहशतवाद्यांनी वाढवली सुरक्षा दलांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 1:25 PM