नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात येथील सफदरजंग रुग्णालयात कामावर असलेल्या सुरक्षारक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या पत्नीला केंद्र सरकार आणि सफदरजंग रुग्णालयाने ५० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिल्लीउच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले की, साथीच्या आजाराच्या काळात लोक स्वत:ची तपासणी करण्यासाठी रुग्णालयांमध्ये गर्दी करत होते आणि अशावेळी सुरक्षारक्षकांनी केवळ रुग्णालयांची सुरक्षा सुनिश्चित केली नाही, तर रुग्णांच्या संपर्कात येऊन मार्गदर्शक म्हणूनही काम केले. सुरक्षारक्षक असोत की परिचारिका त्यांना कदाचित कोविड-१९ वॉर्डमध्ये नियुक्त केले गेले असेल किंवा नसेल. म्हणून ते रुग्णांच्या थेट संपर्कात नव्हते, असे म्हणता येत नाही.
याचिकाकर्त्या संगीता वाही यांचे पती दिलीप कुमार यांचे जून २०२० मध्ये निधन झाले. त्यांना कोरोना रुग्णांच्या सेवेत तैनात करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांना या नुकसानभरपाई योजनेत समाविष्ट करता येणार नाही, असा केंद्राचा युक्तिवाद स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला.
संकुचित दृष्टिकोन ठेवता येणार नाही...
केंद्र सरकार इतका संकुचित दृष्टिकोन घेऊ शकत नाही की, केवळ कोरोना वॉर्ड किंवा केंद्रात नियुक्त केलेल्या व्यक्तींनाच ‘पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज’मध्ये समाविष्ट केले जाईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.