लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. सीएम योगी यांच्या लखनौ बाहेरील दौऱ्यादरम्यान त्यांना अतिरिक्त सुरक्षा पथक दिले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते जाणार आहेत. यादरम्यान त्यांना कडेकोट सुरक्षा देण्यात येणार आहे.
सीएम योगींना अतिरिक्त सुरक्षा अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर सीएम योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये अधिकाऱ्यांची मोठी बैठक घेतली. यामध्ये राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यासोबतच मुख्यमंत्री योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा यूपीच्या बाहेर दौऱ्यावर जातील तेव्हा अतिरिक्त सुरक्षा पथक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अतिक-अशरफ हत्येनंतर सीएम योगी अॅक्शन मोडमध्येप्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याच्या भावाची पोलिसांसमोर हत्या झाल्यापासून योगी आदित्यनाथ सरकार अॅक्शन मोडमध्ये आली आहे. प्रयागराज आयुक्तालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीने सोमवारीही अनेक ठिकाणी छापे टाकले. दुसरीकडे, हत्येतील तीन आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक बांदा, हमीरपूर आणि कासगंज या त्यांच्या मूळ जिल्ह्यात पोहोचले.
सीएम योगींना सध्या झेड प्लस सुरक्षा आहे. देशभरात फक्त 40 लोकांना Z+ श्रेणीची सुरक्षा आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसारखे मोठे नेते आहेत. या श्रेणीत 10 पेक्षा जास्त NSG कमांडो व्यतिरिक्त एकूण 55 सुरक्षा कर्मचारी उपलब्ध असतात. यासोबतच 5 बुलेट प्रूफ वाहनेही सुरक्षा पथकात असतात.