PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारकडे मागितला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत.
पंजाबमध्ये घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत अमित शाह यांनी ट्विट करत राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. "पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेबाबतची कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाऊ शकत नाही. याबाबत संबंधितांना उत्तर द्यावंच लागेल आणि संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित केली जाईल", असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत अमित शाह यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. "पंजाबमध्ये आज काँग्रेस निर्मित घटनेचा ट्रेलर पाहायला मिळाला आहे आणि यातूनच हा पक्षाचे विचार कळतात. काँग्रेस पक्षाकडून काय काम केलं जातं हे दिसून येतं. लोकांनी वारंवार नाकारल्यानं काँग्रेस पक्षाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी याबाबत देशाच्या नागरिकांची माफी मागितली पाहिजे", असं अमित शाह यांनी ट्विट केलं आहे.
पंजाबमध्ये आज नेमकं काय घडलं?पंजाबच्या फिरोजपूर येथे पंतप्रधान मोदींची रॅली होणार होती. पण ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सुरुवातीला रॅली रद्द होण्यामागे पावसाचं कारण देण्यात आले. परंतु आता रॅली रद्द होण्यामागे सुरक्षेचं कारण देण्यात आले आहे. गृह मंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले असून पंजाब सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलंय की, पंतप्रधान मोदी सकाळी भटिंडाला पोहचले होते. त्याठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते.
मात्र पाऊस आणि खराब वातावरणामुळे पंतप्रधान मोदींना २० मिनिटं वाट पाहावी लागली. त्यानंतरही वातावरण तसेच राहिल्याने रस्ते मार्गाने मोदींनी जाण्याचा निर्णय घेतला. रस्ते मार्गाने जाण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार होता. त्याबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजुरी घेतली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा राष्ट्रीय स्मारकाच्या ३० किमी अंतरावर होता. तेव्हा रस्त्यात असणाऱ्या उड्डाणपूलावर मोदींचा ताफा पोहचला तेव्हा अचानक रस्त्यावर शेतकऱ्यांनी ताफा रोखला. या उड्डाणपूलावर जवळपास १५-२० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयाने सांगितले.