शीलेश शर्मानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन योग्य तोडगा काढून लवकर संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तसे न होता हे आंदोलन आणखी चिघळल्यास त्याचा विघातक प्रवृत्ती गैरफायदा घेण्याची व त्यामुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, नवीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाकडे खलिस्तानवादी प्रवृत्ती बारीक लक्ष ठेवून आहेत. हे आंदोलन अधिक चिघळले तर खलिस्तानवादी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बहुतांश पंजाबमधील शेतकरी आहेत. योग्य तोडगा काढून हे आंदोलन लवकरात लवकर न थांबविल्यास त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी अमित शहा यांना सांगितल्याचे कळते.
आंदोलकांवर ड्रोनद्वारे बारीक नजर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबची आर्थिक घडी विस्कटली आहे, असा दावाही त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॅनडा, ब्रिटनमधून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकार अधिक सतर्क झाले आहे. शेतकरी आंदोलकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच आंदोलनाची बारीकसारीक माहिती मिळविण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अतिशय सक्रिय झाल्या आहेत.